इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आता ठाकरे बंधु विजयी मेळावा आज ५ जुलै रोजी मुंबईत वरळी डोम सभागृहात साजरा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित रोहणार आहे. या मेळाव्याची जोरदार आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे व उध्दव ठाकरे हे ठाकरे डोमला पोहोचतील. या मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उध्दव ठाकरे अशी भाषणे होणार आहेत. काँग्रेस नेते आले तर त्यांना देखील भाषण करण्याची संधी दिली जाणार आहे. शेवटचे भाषण हे उध्दव ठाकरे यांचे असणार आहे. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावण्यात आले आहे. बहुदा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाण्याची शक्यता आहे.
८ हजार क्षमतेचा हा डोम सजवण्यात आला असून व्हिआयपी रांगाचीही आखणी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी संपूर्णपणे भगव्या रंगात स्टेज करण्यात आला आहे. झेंडूच्या फुलांनी स्टेजला खास आकर्षक स्वरुप देण्यात आले आहे. आज ठाकरे बंधू काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मेळाव्यासाठी अगोदरच राज व उध्दव ठाकरे यांनी एकत्र आवाहन केले आहे. आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…! आपले नम्र राज ठाकरे – उद्धव ठाकरे
खाली या आवाहन पोस्टमध्ये ठिकाण व वेळ टाकली आहे. त्यात ५ जुलै २०२५, एन. एस. सी. आय. डोम, वरळी सकाळी १० वाजता असे म्हटले आहे.