इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या वादात दोन गट आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही गटामध्ये दगडफेक झाली. संतप्त जमावाने जाळपोळ केली. या दगडफेकीत पोलीस जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेच आवाहन केले आहे.
दरम्यान काँग्रसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर सारख्या शांत शहरात आज जाळपोळ झाली, दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे.गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे, त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे.या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैव आहे, यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नागपूरकरांना आवाहन करतो की सर्वांनी शांतता बाळगावी.
नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळ मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत. नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी.