इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरुन मुक्ताईनगरमध्ये पोलिसांनी चार तरुणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे की, पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची ही बातमी महाराष्ट्रातील वास्तव आहे. पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुली आज महाराष्ट्रात सुखरूप नाही तिथे शेतात, नोकरीवर जाणाऱ्या सामान्य आई वडिलांच्या मुली दररोज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय ‘स्ट्रगल‘ करत असतील आणि किती मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत असेल हा अंदाज महायुतीतील मंत्र्यांना नाही.
आरोपींना पकडण्यासाठी मंत्र्यांना थेट पोलिस स्टेशन गाठावे लागले. आम्ही कधीपासून सांगत आहोत राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही कारण गुंडाना महायुतीचे राजकीय संरक्षण मिळते. लाडक्या बहिण म्हणून मिरवणाऱ्या महायुती सरकारला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे.आता तरी मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का?