नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाल्यानंतर बिघाडी होते की काय अशी चर्चा सुरु आहे. त्यात गेले काही दिवस काँग्रेस व ठाकरे गटातील वादावर जोरदार चर्चा सुरु झाली. पण, दरम्यान काँग्रेस नेते आणि विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, उद्या सायंकाळपर्यंत सर्व जागावाटप निश्चित करु. आता फक्त १७ जागेवर चर्चा सुरु असून त्या फायनल होतील.
यावेळी त्यांनी सांगितले की, विदर्भातील ६-७ जागांवर प्रश्न आहेत आणि तोही सोडवला जाईल. आम्ही आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहोत. २८८ जागांवर ३ पक्ष एकत्रित लढत असल्याने थोडा वेळ लागतो. महाविकास आघाडीच्या सर्व २८८ जागांवर अंतिम निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत होईल असेही त्यांनी सांगितले.
एकीकडे भाजपने आपल्या १०० उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता महायुतीचे घटक पक्ष व महाविकास आघाडीतील पक्ष केव्हा आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची यादी घोषित केल्यानंतर त्यावर नाराज असलेल्यांची रिघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर लागली आहे.