मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले असा आरोप करतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते पुढे म्हणाले की, महिला कुस्तीगीरवर अत्याचार करणाऱ्या भाजप खासदार ब्रिजभूषण सिंगचे एन्काउंटर का नाही केले? त्यावेळी न्याय द्यायचा नव्हता का? स्वतःच्या लोकांना वाचवण्यासाठी वाटेल तसा कायदा मोडायचा असा भाजपचा कारभार आहे.
यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले की, अक्षय शिंदे शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करू शकला असता, त्याआधीच त्याला संपवण्यात आले आहे. त्यामुळे एन्काऊंटर प्रकरणाची न्यायिक चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेंचा पोलीस एन्काउन्टरमध्ये मृत्यू झाला. या घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरुंगातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. खरं तर मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यात फासावर लटकवू असं सांगितलं होत. त्यांची फाशी देण्याची पद्धत अशी आहे का? हा प्रश्न आहे.
ज्या प्रकारे पोलिसांनी प्रेस नोट काढली त्यामधून उत्तरापेक्षा प्रश्नच अधिक निर्माण होतात. अक्षय शिंदेला तुरुंगातून नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याच्या चेहऱ्याला मास्क घातलेलं असून हाताला बेड्या लावल्या आहेत. तशाच अवस्थेत त्याला गाडीत बसवलं असेल तर मग त्यानं बेड्या लावलेल्या हातानं बंदूक कशी खेचली ?त्याला वाहनातून नेताना त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पोलीस बसले होते का? ते बसले असतील तर आरोपीचा हात पोलिसांच्या बंदुकीजवळ कसा गेला? आरोपीनं बंदुकीचं लॉक कसं उघडलं?ज्या अधिकाऱ्यांच्या गोळ्यांनी तो जखमी झाला ती गोळी किती अंतरावरून झाडली गेली? असे एक नाही अनेक सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांनी काढलेली प्रेसनोट ही हास्यास्पद आहे. कारण पोलिसांनी प्रेस नोटमध्ये स्वसंरक्षणार्थ शब्द वापरला आहे. एकाच गोळीत त्याचा मृत्यू झाला. ती गोळी त्याला ताब्यात घेण्यासाठी चालवली होती, की त्याला मारण्यासाठी चालवली होती? कैद्याला ने-आण करण्याचं काम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं नसतं. त्यांचं काम तपास करणं असतं. मग कैद्यांना ने-आण करण्यासाठी असे अधिकारी का नेमले? हे अधिकारी नेमण्यामागचा उद्देश काय होता? बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे हा महत्त्वाचा दुवा होता असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.