मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरा करून तात्काळ ३४४८ कोटींची या राज्यांना मदतीची घोषणा केली आहे. इकडे आपल्या राज्यात कृषी मंत्री सिनेतारका बरोबर व्यस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, चार दिवसांपूर्वी मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथील शेतकऱ्याचा हंबरडा फोडून रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता. अतिवृष्टीमुळे मराठवाडयातील हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबात ऐन सणासुदीच्या काळात नैराश्य आहे. अश्या स्थितीत राज्याचे कृषिमंत्री करोडो रुपये उधळून रश्मिका मंदना- क्रीती सेनन यांसारख्या महागड्या सिनेतारका आपल्या कार्यक्रमात बोलावून आनंद घेत आहे. सरकारच्या मदतीची आस लावून शेतकरी बसला आहे, केंद्र सरकारचे पथक साधे पाहणी करायला आलेले नाही. पण याचा पाठपुरावा करणार कोण?
राज्य सरकारला शेतकऱ्यांचे सवाल आहे. केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर कधी येणार? केंद्रीय कृषी मंत्री नाही तर केंद्रीय पथक तरी मराठवाड्याचे झालेले नुकसान पाहायला येणार का? महाराष्ट्राला केंद्राची मदत मिळणार की नाही? मुख्यमंत्री ,दोन उपमुख्यमंत्री यांनी केंद्रातील मंत्र्यांशी चर्चा केली का? कारण राज्याचे कृषीमंत्री सिनेतारकांसोबत नृत्य करण्यात व्यस्त आहेत. महायुतीचे सरकार किती ढोंगी आहे आणि बळीराजा बाबत ते किती संवेदनशील आहेत हे यातून स्पष्ट होते असेही ते म्हणाले.