मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई येथे शेतकऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमात सरकारने शेतकऱ्यांना चुकीची वागणूक दिल्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचा व्हिडिओ पुढे आला आल्याचे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना न्याय तर द्यायचा नाही, वरून स्वतःच्या जाहिरातीसाठी शेतकऱ्यांना राज्याच्या राजधानीत बोलावून त्यांना अपमानित करायचे हे पूर्णतः चुकीचे आहे. नैसर्गिक आपत्ती आली की मला शिव्या पडतात, त्यामुळे रात्रभर मला उचक्या लागतात असं कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणतात. आज ज्या पद्धतीने महायुती सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे ते बघता विधानसभा निवडणूक पूर्ण होत पर्यंत आता कृषिमंत्र्यांसोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिघांच्या उचक्या थांबणार नाही. त्यामुळे उचक्या लागतील अशी काम या सरकारने करू नये.