नाशिक: आजही बांधकाम परवानगी प्रक्रिया पारदर्शक नाही. परवानगी घेण्यासाठी एक महिना, दोन महिने किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अनेकदा बिल्डरच्या डोक्यावर टांगती तलवार असते. परवानगी लवकर द्यायची सोडून का द्यायची, सगळी कागदपत्रे आहेत का,आणि सगळं जरी बरोबर असेल तरी मुद्दाम उशीर करायचा असं काहीसं चित्र आजही आहे. अर्थात पूर्ण दोष सरकारी लोकांचा नाही कारण ५ दिवस वर्किंग, त्यात अनेक मीटिंग, वेगवेगळे दिवस साजरे करणं आणि जिथे ५० लोकांची गरज आहे तिथे १० लोकंच काम करतात त्यामुळे कामाचा प्रचंड ताण असतो. हे चित्र बदलायला हवे. दिल्लीत ७ दिवसात शहानिशा करून कोणत्याही कामासाठी परवानगी मिळते. थोडक्यात काय तर कामात सुसूत्रता असणे गरजेचे आहे, असे मत असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सानप यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. पुढे ते म्हणाले की, आपला महाराष्ट्र पुढारलेला आहे पण ऑनलाइन की ऑफलाइन यात आपण अडकलेलो आहोत. कोणताही मार्ग असला तरी काम लवकर होणे गरजेचे आहे. कारण जेवढ्या लवकर परवानगी तेवढ्या लवकर सरकारला रेव्हेन्यू मिळू शकतो. पण या सगळ्या प्रक्रियेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्यात बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होतो. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स या राष्ट्रीय संस्थेविषयी सांगताना ते म्हणाले, १९८४ साली बंगलोरमध्ये एक बिल्डिंग पडली. त्याची पाहणी करण्यासाठी तिथले सात सिव्हिल इंजिनिअर्स एकत्र आले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की भारतभर काम करणाऱ्या एका संस्थेची गरज आहे. तेव्हा त्यांच्या प्रयत्नातून या राष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली, बंगलोरमध्ये या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. आणि ३७ वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे.
यावेळी सापन यांनी या संस्थेमधील प्रवासही सांगितला, १९९६ पासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. २००० साली ते या संस्थेचे एक सदस्य झाले. त्यानंतर सेक्रेटरी, चेअरमन, वेस्ट झोनचा प्रेसिडेंट आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर ते कार्यरत आहेत. आणि आतापर्यंतचे सर्वात तरुण तसेच बिनविरोध निवडून आलेले बंगलोर बाहेरचे ते अध्यक्ष आहेत. सद्यस्थितीत सिव्हिल इंजिनिअर्सच्या असलेल्या समस्यांबाबत ते म्हणाले की, सगळ्यात मोठी समस्या आहे ती रोजगारासंबंधी. कोविडचा परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाला. ऑनलाइन शिकून विद्यार्थी बाहेर पडले. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र नुसतं पुस्तकी अभ्यास करून ऑनलाइन शिकून काम करण्यासारख नाही, तर प्रत्यक्ष जागी काम करून शिकण्यासारख आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसमोर आणि आमच्यासमोर आव्हान आहे. म्हणून सध्या आम्ही फिनिशिंग स्कुल तयार करत आहोत. ज्यात विद्यार्थी विनामूल्य प्रॅक्टिकल ज्ञान घेऊन बाहेर पडतील. कॉलेजमधून विद्यार्थी बाहेर पडतात तेव्हा प्रत्येकाला इंडस्ट्रीअल ज्ञान अवगत होतेच असे नाही. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना धरणे, इरिगेशन, स्वतःची प्रॅक्टिस, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, हायवे अशा कोणत्या साईडला जायचं हेही कळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. भारतभरात आम्ही स्टुडन्ट चाप्टर सुरू करत आहोत. नाशिकमध्ये एमव्हीपी इंजिनिअरिंग कॉलेज आणि संदीप फाउंडेशन कॉलेजमध्ये सुरू केले आहेत.
वाढती महागाई आणि कोविडचा रिअल इस्टेट क्षेत्रावर झालेल्या परिणामाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. मोठे फ्लॅट बांधण्यापेक्षा परवडणारी घरे बांधली पाहिजे. परवडणारी म्हणजे कमी किमतीची नाही तर किंमत तीच ठेवून १ बीएचके मध्ये २ बीएचके कसा बांधता येईल याचा विचार बिल्डर लोकांनी करावा. प्रत्येक कामात सुसूत्रता असणे आवश्यक आहे.