लंडन – भारतीय बँकांचे पैसे बुडवून परदेशात परागंदा झालेला उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटिश उच्च न्यायालयाने दिवाळखोर घोषित केले आहे. त्यामुळे जगभरात पसरलेली त्याची संपत्ती जप्त करण्याचा भारतीय बँकांचा मार्ग मोकळा झाला आहे. बंद झालेल्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी मल्ल्याने नऊ हजार कोटींहून अधिकचे कर्ज घेतले होते. कंपनी बुडाल्यावर कर्जाची परतफेड न करताच तो लंडला पळाला होता.
भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या एका संघटनेने मल्ल्याविरुद्ध ब्रिटिश न्यायालयात याचिका दाखल केली होती. भारतात बँकांची फसवणूक आणि मनी लाँड्रिग प्रकरणात त्याचा शोध सुरू आहे. ब्रिटेनमध्ये सध्या तो जामिनावर आहे. ब्रिटनमध्ये शरण घेण्यासाठी त्याने अर्ज दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या चांसरी विभागातील आभासी सुनावणीदरम्यान चीफ इंसाल्वेंसी अँड कंपनी न्यायालयाचे न्यायाधीश मायकल ब्रिग्स यांनी मल्ल्ल्याला दिवाळखोर जाहीर केले. घेतलेल्या कर्जाची मल्ल्याकडून परतफेड करण्याची वास्तविक शक्यता आहे का हे सुनिश्चित करावे. मल्ल्याकडून निश्चित वेळेत कर्जाची पूर्ण परतफेड करण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचे संकेत मल्ल्याच्या वकिलाने दिले आहेत. गुन्हेगारी खटल्यांचा सामना करण्यासाठी मल्ल्या भारतात जाण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न न्यायाधीशांनी त्याच्या वकिलांना विचारला. त्यावर मल्ल्या भारतात जाण्याची कोणतीही शक्यता नाही, असे वकिलाने सांगितले.
मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत किंगफिशर एअरलाइन्सशी जोडलेल्या शेअर्सच्या मोठ्या समभागाच्या विक्रीद्वारे एसबीआयच्या नेतृत्वखालील कर्जदाता कंसोर्टियमला ७९२.११ कोटी रुपये मिळाले आहेत, असे अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच सांगितले होते. देशातील दोन सर्वात मोठ्या कर्ज घोटाळ्यात अडकलेली जवळपास ५८ टक्के भाग संबंधित बँक आणि सरकारला परत मिळाले आहेत, असे ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते.