लंडन – भारतातून फरार झालेला प्रचंड भ्रष्टाचारी आणि कोट्यावधीच्या मालमत्तेचा गैरव्यवहार करणारा मद्यसम्राट – व्यावसायिक विजय मल्ल्या याला कोर्टाने आणखी एक दणका दिला आहे. त्याच्यावरील कायदेशीर कारवाईची फी भरण्यासाठी कोर्टाकडे ठेव (जप्त) असलेली भारतात संपत्ती वापरण्याचे अधिकार मिळावेत, असा अर्ज मल्ल्याने केला होता. मात्र, तो कोर्टाने फेटाळला आहे.
येथील हायकोर्टाने सांगितले की, विजय मल्ल्या या ६५ वर्षीय व्यावसायिकाने फी भरण्यासाठी ७.५ दशलक्ष पौंड मिळविण्यासाठी अपिल केले, मात्र पैसे मिळविण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध करुन देण्यात तो अपयशी ठरला. या प्रकरणी आभासी सुनावणी दरम्यान, जस्टिस रॉबर्ट माईल्स यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात असलेल्या भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमच्या बाजूने निकाल दिला.
कोर्टाकडे असलेल्या काही ठेवी मल्ल्याला मिळण्यापासून रोखण्यासाठी भारतीय बँका मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्या आहेत. न्यायमूर्ती माईल्स म्हणाले की, मल्ल्याने मागणी केलेली रक्कम खूप जास्त आहे. यामध्ये आधीपासून झालेल्या खर्चासंदर्भात ५.५ लाख पौंडची मागणी करण्यात आली होती, तर भविष्यातील खर्चासाठी दोन लाख पौंड मागितले गेले. मात्र त्याने विविध कामकाजादरम्यान झालेल्या खर्चाचा तपशील दिलेला नाही. खर्चासंदर्भात कोणतीही पावती, बिले किंवा अन्य पुरावे उपलब्ध करुन देण्यात आले नाहीत.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात डेप्युटी इनसोल्वेंसी अॅण्ड कंपनीज कोर्टचे न्यायाधीश निजेल बार्नेट यांनी आपल्या आदेशाद्वारे मल्ल्या यांना कोर्टाकडे जमा झालेल्या पैशांचा सुमारे १.१ दशलक्ष पौंड खर्च करण्याची मुभा दिली होती, तसेच मल्ल्या यांनी भारत आणि ब्रिटनमधील राहण्यासाठी आणि कायदेशीर खर्चासाठी ही रक्कम मागितली होती.