नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येईल. जिल्ह्यात मंगळवार 22 ऑक्टोबर 2024 पासून ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांची दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
निवडणुकीचा तपशीलवार कार्यक्रम असा : नामनिर्देशन पत्र प्राप्त करणे आणि दाखल करणे- 22 ते 29 ऑक्टोबर 2024, वेळ – सकाळी 11 ते दुपारी 3 (सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता) दाखल करावयाचे ठिकाण- संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, नामनिर्देशन पत्रांची छाननी- 30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात, उमेदवारी अर्ज मागे घेणे- 4 नोव्हेंबर 2024 (सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत), संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात, मतदानाचा दिनांक व वेळ- 20 नोव्हेंबर 2024, वेळ – सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2024. नाशिक जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांची कार्यालये यांची नावेही जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवाराची पात्रता : उमेदवार भारतीय नागरिक असावा, वय 25 वर्षापेक्षा जास्त असावे. उमेदवाराचे नाव महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीत असावे. नामनिर्देशन पत्र दाखल करणेसंदर्भात महत्वाच्या सूचना : उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र विहीत नमुना ” 2B ”, उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शपथ / दृढकथन करावे. शपथपत्र नमुना – 26. (प्रथम वर्ग दंडाधिकारी / नोटरी यांचेसमक्ष स्वाक्षरी केलेला), मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र. मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबतचे उमेदवाराचे लेखी पत्र, नामनिर्देशनपत्रासोबत जमा करावयाची अनामत रक्कम रुपये 10,000, अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारासाठी रुपये 5,000 /- मात्र, एक उमेदवार जास्तीत जास्त 4 नामनिर्देशनपत्र सादर करू शकेल, एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज करू शकणार नाही, उमेदवारास मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक, तर अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष किंवा अपक्ष असल्यास एकूण 10 सूचक आवश्यक. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहीत सूचना पत्र (AA&BB) (नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी 3 वाजेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक), नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे विहीत शपथपत्र नमुना 26 मधील सर्व रकाने भरणे आवश्यक, एखादी बाब लागू नसेल तर ” निरंक ” / ” लागू नाही ” असा तपशील नोंदविणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे मतपत्रिकेवरील छायाचित्राबाबत (फोटो) : उमेदवारांनी साधारणत: तीन महिन्यांच्या आतील कालावधीत काढलेला फोटो निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडेस नामनिर्देशन पत्रासोबत किंवा जास्तीत जास्त छाननीच्या वेळेपूर्वी द्यावा. फोटोचा आकार 2 X 2.5 सेंटीमीटर, चेहरा समोर आणि पूर्ण तसेच डोळे उघडे असावेत, मागील बाजू पांढऱ्या रंगाची असावी. फोटो रंगीत किंवा ब्लॅक आणि व्हाईट असावा, उमेदवारांनी सर्वसाधारण कपडे परिधान केलेले असावेत, कोणताही गणवेश असू नये. टोपी, हॅट व गडद रंगाचा चष्मा टाळावा. फोटोच्या मागील बाजूला उमेदवाराची किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांची स्वाक्षरी असावी. फोटोसोबत विहीत नमुन्यातील घोषणापत्र (उमेदवाराचे नाव, पत्ता असलेले आणि सदर फोटो लगतच्या तीन महिन्यांपूर्वी काढलेला असल्याचे घोषणापत्र) असावे.
दैनंदिन खर्च व स्वतंत्र बॅंक खाते : लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 76 अन्वये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणा-या उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा हिशेब सादर करण्याच्या तरतुदी लागू आहेत. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी करावयाच्या खर्चासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडावे, असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. उमेदवारास बॅंक खाते कोणत्याही बॅंकेत (राष्ट्रीयकृत / सहकारी बॅंक ) किंवा पोस्टात उघडता येईल.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी खर्चाची मर्यादा रुपये 40 लाख निश्चित करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचा हिशेब ठेवायचा असून उमेदवारांच्या खर्चाचा तपशील तपासण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय खर्च निरीक्षकांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे.
फौजदारी प्रकरणे दाखल असणाऱ्या उमेदवारांना सूचना : फौजदारी प्रकरणे दाखल असणाऱ्या उमेदवारांकरीता वृत्तपत्र आणि टेलिव्हिजन चॅनेलवर प्रचाराच्या कालावधीमध्ये तीन वेळा प्रसिद्धी देणे आवश्यक आहे. तसेच अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या राजकीय पक्षाने देखील एका वर्तमान पत्रामध्ये तसेच सोशल मीडियावर माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करणा-या उमेदवारांनी घ्यावयाची दक्षता : निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येतील. यासाठी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी शंभर मीटर परिसराची निश्चिती (मार्किंग) आधीच निश्चित करतील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवार आणि त्यांच्यासमवेत चार व्यक्ती, असे एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात एकाच दाराने प्रवेश देण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येईल. मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीची आदर्श आचारसंहिता निवडणूक घोषित झाल्याक्षणीच लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आपल्या सर्वांसाठी बंधनकारक आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करणा-या उमेदवारांनी या सर्व बाबींची नोंद घेऊन नामनिर्देशन पत्र निर्धारित वेळेत दाखल करावयाचे असून नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी निवड़णूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे.