नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विभानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून सर्व राजकीय पक्षाचे उमदेवार, निवडणूक लढविणारे उमदेवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी निर्बध घालण्याचे आदेश दिले आहेत.
हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. शर्मा यांनी आदेशित केले आहे.