नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र् विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांसाठी 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात 5 जणानांच प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 अशी वेळ निर्धारित करणेत आली असून या निर्धारित वेळेत उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल करावयोच आहे. नामनिर्देश पत्र दाखल करण्याबाबत निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात किती वाहनांना प्रवेश असेल त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात किती व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा याबाबत भारत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट आणि सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. या सुचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करणारे इच्छूक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी खालील सूचनांचे पालन करावे
- निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येतील. यासाठी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी शंभर मीटर परिसराची निश्चिती ( मार्किंग ) आधीच निश्चित करतील.
- निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवार आणि त्यांच्या समवेत चार व्यक्ती अशा एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल.
- निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात एकाच दाराने प्रवेश देण्यात येईल.
- या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल.
- निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिस विभागाक़डून सहायक पोलिस आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाचे अधिकारी यांची नोडल अधिकारी
- म्हणून नियुक्ती करणेत येणार असुन पोलिस नोडल अधिकारी या ठिकाणी आवश्यक पोलिस बंदोबस्तासह उपस्थित राहतील
नामनिर्देशन पत्र दाखल करणा-या उमेदवारांनी या सर्व बाबींची नोंद घेऊन नामनिर्देशन पत्र आयोगाकडून निर्धारित वेळेतच दाखल करावयाचे आहे, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.