इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ५ कोटी २२ हजार ७३९, तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या आहेत, ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.
राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार
राज्यात 4,69,96,279 महिला मतदार आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग (PwDVoters) मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांची संख्या 1,16,170 आहे.
राज्यात एकूण 4136 उमेदवार
राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण ४ हजार १३६ उमेदवार आहेत. ज्यामध्ये ३,७७१ पुरूष, ३६३ महिला आणि तर अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मतदानासाठी 2,21,600 बॅलेट युनिट
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,186 इतक्या मतदान केंद्रांसाठी 2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5166 बॅलेट युनिट, 5166 कंट्रोल युनिट व 5165 व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण 185 विधानसभा मतदाररसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर 100 मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र सज्ज
विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता येण्यासाठी राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.
महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र राहणार आहेत. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.