नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने विविध बाबींची पुर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासन नाशिक मागील एक वर्ष आधीपासुनच निवडणूकीच्या तयारीत व्यस्त आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत अतिशय उत्साहाने सहभाग जिल्ह्यातील मतदारांनी नोंदविला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतही जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
निवडणूकीची पुर्वतयारी प्रशासन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान एक वर्ष आधीपासुनच करत असते. मतदान यंत्रांची मतदान केंद्रानुसार मागणी, पुरवठा तसेच या यंत्रांची तज्ञ अभियंत्यांकडून सखोल तपासणी यासारख्या बाबीपासुन तयारी वेग पकडते. निवडणूक घ्यायची म्हटली म्हणजे मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. मनुष्यबळ व्यवस्थापन हे जिल्हा प्रशासनासाठी आवाहन असते. अचूक मनुष्यबळाची निवड, त्यांचे प्रशिक्षण, प्रशिक्षणात विविध महत्वाच्या बाबी, नियम, कायदे समजावून सांगणे, हस्तपुस्तिका देणे, मतदान यंत्रांचा सराव इत्यादी बाबी जिल्हा प्रशासनाकडून हाताळल्या जातात. मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी पथके यांना पोहोचविणे, परत आणणे, यासाठी मतदान केंद्रानुसार मार्गाचे आराखडा तयार करणे, अधिकारी –कर्मचारी संख्या आणि मतदान केंद्रांचे क्षेत्र यानुसार वाहनांचे नियोजन इत्यादी बाबी प्रशासनाकडून लक्षात घेतल्या जातात. मतदान केंद्रांवरील अधिकारी यांचे प्रशिक्षणासाठी पॅावर पॅाइंट प्रेझेंटेशन आणि स्लाईड़ शो द्वारा विविध तपशील समजावून सांगण्यात येतो.
निवडणूक म्हणजे विविध सूचनांचा सारसंग्रह, दिशानिर्देश, तपासणीसुची, विविध अर्ज नमुने याबाबतची तयारी आयोगस्तरावर देखील एक वर्ष आधीपासुन सुरू असते. ऐनवेळी दिलेले दिशानिर्देश, कायद्यात, नियमात झालेले बदल इत्यादी आयोगाच्या शेवटच्या टप्प्यातील अधिका-यांपर्यत पोहोचविण्यासाठी आयोग सतत कार्यरत असतो. निवडणूकीसाठी साहित्य, विविध फॅार्म्स, विहित नमुने, पाकीटे, हस्तपुस्तिका, दिशानिर्देशांचा संच यांची छपाई शासनाच्या मुद्रणालयाकडून करण्यात येते. यासाठी देखील एक वर्ष आधीपासुन मुद्रणालय स्तरावर नियोजन सूरू होते. निवडणूकीचे काही दिवस आधी हे साहित्य जिल्हा प्रशासनाकडून आणण्यात येते. साहित्य प्राप्त झाल्यावर त्याचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण, त्यानंतर विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदान केंद्र निहाय वितरणासाठी तयारी करण्यात येते.
प्रत्यक्ष मतदान झाल्यावर मतदान यंत्रे मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष स्ट्राँग रूम निश्चिती, त्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाची नियुक्ती , मतमोजणी इत्यादी बाबींची देखील पुर्वतयारी करण्यात येते.