नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची अंतिम मुदत होती. 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून माघारीसाठी अंतिम मुदत 4 नोव्हेंबर 2024 अशी आहे. या दिवशी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर नामनिर्देशनपत्रांच्या छाननी प्रक्रियेत अर्ज वैध ठरल्यावर संबंधित उमेदवार निवडणुकीसाठी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार बनतात. मात्र, उमेदवारास निवडणुकीच्या लढतीतून माघार घेण्याची इच्छा असल्यास उमेदवारी अर्ज माघारी घेता येतो. त्यासाठीच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. त्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता आयोगाने घोषित केलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अंतिम मुदत 4 नोव्हेंबर 2024 आहे. या दिवशी उमेदवारांनी अर्ज माघार घ्यावयाचा निर्णय घेतला असल्यास तशी लेखी सूचना विहीत नमुना 5 मध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल. उमेदवारी अर्ज माघारी घ्यावयाच्या अर्जावर उमेदवारानेच सही केली पाहिजे आणि उमेदवारी मागे घेण्याची सूचना विहीत नमुना 5 मध्येच असली पाहिजे. हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
माघारीची सूचना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजेच 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावी. उमेदवाराला स्वत: किंवा त्यांचा प्रस्तावक असेल अशा प्रस्तावकांपैकी एका प्रस्तावकाद्वारे किंवा त्याने नियुक्त केलेल्या निवडणूक प्रतिनिधी यांच्यामार्फत माघारीची सूचना देता येईल. मात्र, अशा वेळी अशा प्रस्तावकास किंवा निवडणूक प्रतिनिधीस उमेदवाराकडून लेखी प्राधिकृत केले असले पाहिजे. उमेदवाराने प्रस्तावकास किंवा निवडणूक प्रतिनिधीस लेखी प्राधिकृत केल्याशिवाय उमेदवारी मागे घेण्याची सूचना वैध ठरणार नाही.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना टपालाद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे पाठविली जाणार नाही. उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची सूचना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केल्यावर ती सूचना अंतिम ठरते. आणि एकदा दिलेली सूचना परत घेण्यासंबंधी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. उमेदवारी मागे घेण्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वीकारल्यावर नामनिर्देशनपत्र सादर करताना जमा केलेली रक्कम त्यांना परत मिळते. उमेदवारी मागे घेतल्यास निवडणुकीचा हिशेब दाखल करण्याची आवश्यकता नसते, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.