मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून केंद्र निरीक्षक (Central Observer) यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी १३९ सामान्य निरीक्षक (General Observer), ४१ पोलीस निरीक्षक (Police Observer) व ७१ खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ९८ टक्के तक्रारी निकाली
१५ ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात ‘सी-व्हिजिल ॲप’(C-Vigil app)वर एकूण १०११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ९९५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९८ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे ‘सी-व्हिजिल ॲप’ (C-Vigil app) हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
४४ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता जप्त
राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ४४ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचे मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एकूण ३६६ दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहे. सदर दखलपात्र गुन्ह्यांमध्ये मतदान कर्मचारी, निवडणूक साहित्य (EVM/VVPAT), आचारसंहिता, सोशल मीडिया/फेक न्यूज व इतर बाबींशी संबंधित आहे. या ३६६ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्हे अंतिम झाले असून ३०६ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत, तसेच १६ गुन्हे तपासाधीन असल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.