नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक असलेल्या मतदारसंघाच्या हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या १८ ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला आहे.
महाराष्ट्र देशी दारू नियम, महाराष्ट्र विदेशी मद्य नियम (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.), महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडीची झाडे नियम, विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देत आहे. अनुज्ञप्ती बंदची तारीख, दिवस आणि वेळ या क्रमाने : १८ नोव्हेंबर २०२४, मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर, सायंकाळी ६ वाजेपासून. १९ नोव्हेंबर २०२४, मतदानाच्या पूर्वीचा दिवस, संपूर्ण दिवस. २० नोव्हेंबर २०२४, मतदानाचा दिवस, मतदान संपेपर्यंत. २३ नोव्हेंबर २०२४, मतमोजणीचा दिवस, संपूर्ण दिवस अनुज्ञप्त्या बंद राहतील.
संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावाणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी नमूद केले आहे.