मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम् व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.
या अधिवेशनात राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या २८८ आमदारांच्या शपथविधीसाठी सुरुवात झाली. पण, पहिल्याच दिवशी विरोधकांनी शपथ न घेता सभात्याग केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करत आंदोलनही करण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, आम्ही जिंकलो असलो तरी या निकालावर महारष्ट्राचा विश्वास बसत नाही. हे सरकार लोकशाही पध्दतीने आले नाही.
दरम्यान या बहिष्कारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या कृतीची खिल्ली उडवत विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या ३१ जागा आल्या. त्यावेळी ईव्हीएम मशिनला दोष देण्यात आला नाही. त्यावेळेस चांगलं होतं, पण विधानसभेत पराभव होताच त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. लोकशाहीत प्रत्येकाला काय बोलायचं हा अधिकार आहे. पण, विरोधकांना शपथ घेण्यासाठी उद्याचाच दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागले. ती एक प्रोसिजर आहे. तरच त्यांना परवा सभागृहातील कामकाजात सहभागी होता येईल.