मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधानपरिषदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित करण्यात आले असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. राष्ट्रगीताने अधिवेशन कामकाजाची सांगता करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर तीन दिवसांचे विशेष अधिवेशन झाले. यात नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. त्यानंतर विधासभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली.
आता सत्ता स्थापनेच्या ११ दिवसानंतर १६ डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा होते व विरोधी सदस्य कोणते प्रश्न मांडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.