इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीमुळे कोणालाच बहुमत मिळाले नाही, तर सरकार स्थापन होणे अशक्य आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी ४८ तासांत करणे आवश्यक आहे. पण, हे अशक्य आहे. यामुळे राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्लॅनिंगमध्ये असल्याचा आरोप केला होता. राऊत यांच्या आरोप खरा-खोटा ठरविण्यापेक्षा सध्याची परिस्थिती तिकडेच बोट दाखवत आहे. आमदारांना राज्यभरातून मुंबईत यासाठी यावे लागणार आहे. २३ तारखेला अनेकांना रात्री उशीरा निवडणूक आयोग प्रमाणपत्र देणार आहे. यानंतर त्यांना मुंबईत येण्यासाठी मिळेल तो मार्ग पकडून यावे लागेल.
जर बहुमताचा आकडा कोणालाच पार करता आला नाही, तर या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू होतात. यामुळे या आमदारांना कुठेतरी दूर हॉटेलमध्ये नेऊन एकत्र ठेवावे लागते. यात आमदारांच्या घोडेबाजारालाही उत येतो. अनेक आमदार फोन बंद करून बसतात, यामुळे तो पक्षही या काळात गॅसवरच राहतो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बनेल असे संकेत मिळत असले तरी बऱ्याचशा गोष्टी या आज ठरणार आहेत.