नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 करीता भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम लवकरच घोषित होणार असून त्यानंतर निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू होते. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करतांना शासकीय परिसर, मालमत्तेचे विद्रूपीकरण, सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण, परिसराचा गैरवापर, खाजगी मालमत्तेचे विद्रूपीकरण या संदर्भात खालीलप्रमाणे सर्वसमावेशक सूचना निर्गमित करणेत आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
- कोणत्याही शासकीय जागेत ( शासकीय इमारती, शासकीय इमारत ज्या जागेत आहे त्या जागा) भिंत रंगविणे, लेखन करणे , पोस्टर्स, बॅनर्स चिकटवणे , झेंडे लावणे, कटआऊट्स व होर्डींग्ज उभारणे या सारख्या प्रकाराने विद्रूपीकरण करता येणार नाही.
- सार्वजनिक उपक्रमांच्या इमारती व जागेत देखील शासकीय इमारती व जागेसाठी ज्या तरतुदी लागू आहेत त्याप्रमाणेच या तरतुदी निवडणूकीचे कालावधीत लागू रहातील. निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आदर्श आचारसंहिता लागू असतांना कोणतीही राजकीय जाहिरात सार्वजनिक उपक्रमांच्या मालकीचे इमारती व जागेत प्रदर्शित करता येणार नाही.
- खाजगी जागांवर, घरांवर झेंडे लावणे, बॅनर्स , पोस्टर्स लावतांना संबंधित जागामालकाची परनावगी घेऊन लावता येतील. तथापी असे झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अशी जाहिरात करतांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जागामालकाची संमती असल्याची प्रत देणेत यावी. राजकीय स्वरूपाची जाहिरात, झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स प्रदर्शित करण्याबाबत संबंधित जागा मालकाने स्वखुशीने संमती दिलेली असावी , यासंदर्भात जागा मालकाकडून धाक-दपटशाही वा बळजबरीने अशी संमती घेता येणार नाही.
- मोटार वाहन कायद्यानुसार खाजगी वाहनावर स्टीकर, झेंडा इत्यादी संबंधित वाहन मालकांना स्वत:च्या जबाबदारीवर इतरांना त्रास न होता लावता येईल. तथापी खाजगी वाहनावर लावलेले असे झेंडे, स्टीकर एखाद्या विशिष्ट उमेदवारास मत द्यावे या उद्देशाने प्रचारासाठी लावले असेल तर अशा वेळी आय.पी.सी. 171 एच (निवडणूकीसंदर्भात प्रचारासाठी केलेला बेकायदेशीर खर्च ) नुसार कारवाई करणेत येईल.
- व्यावसायिक वाहनांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून विहित परवानगी घेऊन वाहनांवर स्टीकर, झेंडा इत्यादी प्रदर्शित करता येईल. तथापी याबाबतची परवानगी त्या वाहनांवर पुढील काचेवर दर्शनी भागावर लावावी लागेल.
शासकीय परिसर, मालमत्तेचे विद्रूपीकरण,सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण, परिसराचा गैरवापर, खाजगी मालमत्तेचे विद्रूपीकरण या संदर्भात वरीलप्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांची सर्व संबंधित शासकीय, निमशासकीय यंत्रणा , राजकीय पक्ष, उमेदवार यांनी दखल घ्यावी. अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या सुचनांचे अवलोकन करणेत यावे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.