मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्रातील सुरू प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येईल, असे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य सत्यजित तांबे यांनी राज्यातील वाहतूक कोंडी, चुकीची चलने, पोलिसांची कारवाई आणि मोठ्या शहरांतील प्रकल्पांसंदर्भात अर्धा तास चर्चेच्या सूचना मांडल्या होत्या, त्यास मंत्री डॉ. सामंत यांनी उत्तर दिले.
मंत्री डॉ .सामंत म्हणाले की, वाहतूक कोंडी ही मुंबईसह सर्व मेट्रो शहरांमध्ये मोठी समस्या झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील महिन्यांत तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले. यात एक बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने 20 दिवसांत गृह व परिवहन विभागाला अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
गाडी पार्किंगमध्ये असतानाही चलन मिळतात, हे गंभीर प्रकार आहेत. त्यांचीही चौकशी सुरु आहे. कोणी आणि कुठे कॅमेरे लावले, याची माहिती घेतली जात आहे, असे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. वाहनांची वाढती संख्या देखील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी नमूद केले. आजपर्यंत महाराष्ट्रात 4 कोटी 95 लाख वाहने नोंदवण्यात आली आहेत. फक्त मुंबईत दररोज 794 नव्या वाहनांची नोंद होते. यामुळेच मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात मेट्रो प्रकल्पांची प्रगती सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईत 393.76 किमी, पुण्यात 136.42 किमी आणि नागपुरात 83.82 किमी लांबीचे मेट्रो प्रकल्प साकारले जात आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1.5 ते 2 कोटी लोक दररोज मेट्रोने प्रवास करतील. मुंबईतील सागरी किनारा रस्ता हा ऐतिहासिक प्रकल्प असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, पूर्वी वांद्र्याहून नरिमन पॉईंटला पोहोचायला दीड ते दोन तास लागायचे, आता तोच प्रवास 17-18 मिनिटांत होतो.
पुढे बोलताना मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले की, वसई-विरारपर्यंत मेट्रो नेण्याचा संकल्प केला आहे. शहरांत रिंगरोडसुद्धा उभारल्या जात आहेत. सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत शहरांतून अवजड वाहने जाऊ नयेत, यासाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत.
सभागृहात सदस्य तांबे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, वाहतूक नियंत्रण करताना पोलीस, परिवहन आणि महसूल विभाग एकत्रित कारवाई करतात. यामुळेही ट्रॅफिक जाम होतो. यावर तोडगा काढण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, सर्व संबंधित मुद्दे त्या समितीत समाविष्ट केले जातील.