मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदणी नदीवरील मौजे खेड – मानेवाडी ते शिंपोरा या रस्त्यावर असलेला पूल वाहून गेल्याच्या घटनेची चौकशी मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीकडून करण्यात येणार असून दोषी अधिकारी अथवा अभियंते यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली.
वसंत खंडेलवाल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे ही बाब उपस्थित केली होती. यावेळी सदस्य प्रवीण दरेकर व शशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
पूल वाहून गेल्याच्या घटनेबाबत सभापती प्रा. राम शिंदे यांनी सात दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यापूर्वी दिले होते.त्याचा प्राथमिक चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले की, कर्जत तालुक्यातील शिंपोरा, मानेवाडी व खेड या गावांचे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले होते, मात्र सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. नांदणी नदीला आलेल्या पुरामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुमारे २० मीटरचा भराव वाहून गेला, ज्यामुळे स्लॅब व विंग वॉलसुद्धा वाहून गेले.
मंत्री गोरे म्हणाले की, पुलाचे पुनर्बांधकाम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (MRRDA) यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. आवश्यक निधी पूरहानीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या ग्रामीण रस्ते दुरुस्ती कार्यक्रमातून उपलब्ध करुन देण्यात येईल.
पुलाच्या बांधकामासाठी जागेचे सर्वेक्षण व पायाची खोली तपासण्याचे तांत्रिक काम सध्या प्रगतीपथावर आहे. तसेच पुलास जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामासाठी २ कोटी ७७ लाख रुपयांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत खडीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, कारपेट व सिलकोटची कामे सुरू आहेत, अशी माहितीही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी दिली.