इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. या मारामारीत जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांचा शर्ट फाडण्यात आले. शिविगाळ करण्यात आली. या प्रकरणाची सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील पक्षाच्या नेत्यांनी गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान भाजपचे मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या भेटीनंतर पडळकर यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. याआधी मात्र त्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते हसत हसत निघून गेले होते. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा घटना घडणं चुकीचं असल्याचे म्हटलं आहे.
या घटनेवरुन सामाजिका कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे की, एक नागरिक म्हणून आज शरमेने मान खाली घालवीशी वाटते. जेव्हा गुंडांच्या हातात राजकारण जात तेव्हा काय होऊ शकते त्याचे प्रात्यक्षिक आज आपण पाहिले. ही लोकं विधानभवन बसण्याच्या पात्रतेची तरी आहेत का? पडळकरांनी आणि आव्हाडांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. ही गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. विधान भवन हे लोकशाहीचे मंदिर आहे, तुमचा आखाडा नाही. ह्या पुढे कारण नसल्याशिवाय पास देणे बंद केले पाहिजे.
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वाह क्या सीन है.. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी गुंडागर्दी करणाऱ्यांवर कारवाई झाली असती तर आजची नामुष्की टळली असती..! देवेंद्रजी,सुसंस्कृत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ऱ्हास पावली यावर तुमच्या आशीर्वादाने शिक्कामोर्तब झाले. लज्जास्पद असे म्हटले आहे.