मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे सरकारला पाठींबा देत मंत्रीपद स्वीकारले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असलेले अजित पवार आता उपमुख्यमंत्री झाले असताना विरोधी पक्षनेतेपदाचा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि शिवसेने या दोनपैकी कुणाच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडणार, या प्रश्नचिन्ह कायम आहे.
अजित पवार यांना राष्ट्रवादीतील ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबरच अजित पवारांनीही आमदारांची बैठक घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील ३५ आमदारांचा जर अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीकडील विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे विधानसभेत ५४ आमदार आहेत. त्यापैकी ३५ आमदार अजित दादांसोबत गेल्यास उर्वरित १९ आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत असे चित्र आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाकडे विधानसभेत १६ आमदार आहेत, तर काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. परिणामत: काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी देखील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काकासाहेब कुलकर्णी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच विरोधी पक्ष नेते होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात लोकशाही संपावण्याचा विडा भाजपने उचलेला आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
चव्हाण, थोरात, पटोले यांची चर्चा
विधानसभा विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी प्रदेशप्रमुख बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत आहेत.