मुंबई – राज्यातील सहा विधान परिषद जागांसाठीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील समझोता यशस्वी ठरला आहे. त्यामुळेच तीन जागा आतापर्यंत बिनविरोध झाल्या आहेत. त्यात काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव तर, कोल्हापूरमधून काँग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता धुळे-नंदुरबारच्या जागेचाही फैसला झाला आहे. याजागी भाजपचे अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विधान परिषदेच्या एकूण ६ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडी तर विरोधात भारतीय जनता पक्ष असे चित्र आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून बिनविरोध निवडीसाठी हालचाली सुरू होत्या. त्यात तीन जागांवर राजकीय पक्षांना यश आले आहे. यातील एका जागेवर काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची निवड झाली आहे. तर, कोल्हापूर येथील जागेवार विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांना बिनविरोध निवडून देण्याचे मान्य झाले आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात तशी बोलणी झाली आहे. त्यापाठोपाठ धुळे-नंदुरबारमधील जागेवर भाजपचे विद्यमान आमदार अमरिश पटेल यांना पुन्हा संधी मिळाली आहे. काँग्रेसने याठिकाणी त्यांचे उमेदवार गौरव वाणी यांना माघार घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता तीन जागांचे बिनविरोध निकाल लागले असले तरी अद्याप मुंबई, नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम या जागेची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.