मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. अमरावती, औरंगाबाद आणि कोकण या तीन ठिकाणचे उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. मात्र, नाशिक आणि नागपूर या दोन जागांसाठी अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नक्की कुणाला उमेदवारी देण्यात येईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भारत निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक ३० जानेवारी २०२३ राेजी होणार आहे. डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य ७ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले आहेत. या रिक्त पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
निवडणूक कार्यक्रम असा :
गुरुवार दि. ५ जानेवारी २०२३ रोजी या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध. गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. १३ जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, सोमवार दि. १६ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होईल.
हे आहेत भाजपचे उमेदवार
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ – डॉ. रणजित पाटील
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ – किरण पाटील औरंगाबाद
कोकण विभाग शिक्षक मतदार संघ – ज्ञानेश्वर म्हात्रे
?भाजप कार्यालय वसंतस्मृति, दादर येथे माध्यमांशी संवाद https://t.co/aiGUHgQhCa
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) January 9, 2023
Vidhan Parishad Election BJP Candidates Declared