मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यातील विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. त्यासाठी गुरुवारी (९ जून) अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी अर्ज दाखल केला आहे. अखेरच्या दिवशी अर्ज दाखल झाल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपकडून ६, शिवसेना आणि काँग्रेसकडून प्रत्येकी २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. एकूण दहा जागांसाठी १३ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.
विधानपरिषदेत रिक्त होणाऱ्या दहा जागांपैकी भाजपच्या ५ जागा आहेत. मात्र सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला ४ जागा निवडून आणता येतील. याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी २ आणि काँग्रेसची १ जागा निवडून येऊ शकतात. काँग्रेसला दहाव्या जागांसाठी आणखी मतांची गरज आहे. त्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल.
आधी भाजपने सदाभाऊ खोत यांना संधी नाकारली होती. परंतु ऐनवेळी भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने भाजपकडून आता सहा अर्ज सादर झाले आहेत. राष्ट्रवादीकडून शेवटच्या दिवशी एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची नावे जाहीर झाल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचे वृत्त होते. परंतु जयंत पाटील यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
पक्षनिहाय उमेदवार असे
राष्ट्रवादी काँग्रेस – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवाजीराव गर्गे (अतिरीक्त)
काँग्रेस – भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे
शिवसेना – सचिन अहिर, आमशा पाडवी
भाजप – उमा खापरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड
अपक्ष – सदाभाऊ खोत (भाजप पुरस्कृत)