नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला असून १९ डिसेंबर २०२४ रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.
या पदासाठी महायुतीमध्ये कोणाला संधी मिळते हे महत्त्वाचे आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तीन घटक पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे सभापतीपदी कोणत्या पक्षाला संधी दिली जाते व त्यात कोणाला हे पद मिळते हे औत्सुक्य़ असणार आहे. दरम्यान भाजपतर्फे राम शिंदे यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.