मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये साहित्य खरेदीमध्ये १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. लोढा बोलत होते. यावेळी सदस्य अभिजित वंजारी यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, यापूर्वी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन वेळा समिती स्थापन करण्यात आली होती. नंतर लोकायुक्तांकडे गेले. त्यांनी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.