मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षावर झालेल्या तक्रारीसंदर्भात सहकार संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये चौकशी सुरू आहे. ही चौकशी दोन महिन्यांत पूर्ण होईल आणि त्यामध्ये ते दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिले.
विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय, शशिकांत शिंदे यांनी सह्याद्री बँकेत झालेल्या अनियमितेची चौकशी करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
सहकार मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी या प्रकरणात अधिनयमाच्या कलम 83 आणि कलम 88 अशा दोन्ही चौकशा सुरू करण्यात आल्या होत्या, परंतु कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत कलम 88 ची चौकशी सुरू करण्यासाठी आधी कलम 83 ची चौकशी पूर्ण करणे आवश्यक असते. कलम 83 ची चौकशी अर्धवट राहिल्यामुळे ती रद्द करून सध्या नव्याने चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, चौकशी प्रक्रियेत दोषी आढळणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. अशा कारवाईसाठी नियमानुसार वेळ आणि प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.