चेन्नई – सार्वजनिक ठिकाणी विशेषतः कार्यालयीन कामकाज किंवा न्यायालयीन कामकाजादरम्यान कसे वागावे याचे काही संकेत असतात. हे संकेत पायदळी तुडवून काही जण वागायचा प्रयत्न करतात. शिष्टाचार न पाळण्याचा ठपका बसून अशा व्यक्तींची बदनामी होतेच होते. परंतु शिष्टाचाराप्रमाणे न वागल्याची त्यांच्यावर कारवाईसुद्धा होते. असेच एक कृत्य एका वकिलाने केले आणि ते त्याच्या चांगलेच अंगलट आले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान एका वकिलाला रासलीला करणे खूपच महागात पडले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अवमाननेची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वकिलाचे कृत्य लाजिरवाणे आहे. यामुळे न्यायालयाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबी-सीआयडीच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ तत्काळ हटविण्याचा मार्ग शोधावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. न्यायमूर्ती जी. के. इलाथिरियान यांच्या खंडपीठाकडून व्हीसीद्वारे सुनावणी सुरू असताना ही लाजिरवाणी घटना घडली आहे. या प्रकरणात एक वकील एका महिलेसोबत आपत्तीजनक स्थितीत शरीर संबंध ठेवताना दिसून आला. ही घटना पाहताच न्यायाधीश चांगलेच संतापले आणि वकिलाविरुद्ध त्वरित चौकशी लावून अवमाननेची कारवाई सुरू केली.
माय लॉर्ड हे काय सुरू आहे?
कर्नाटक उच्च न्यायालयासमोर अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले होते. व्हीसीद्वारे सुनावणी सुरू असताना एक व्यक्ती अर्धनग्न सहभागी झाली होती. माजी मंत्र्यांशी संबंधित एका खटल्यावर खंडपीठाकडून सुनावणी सुरू असताना ही घटना घडली होती. वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह म्हणाल्या होत्या, की एका महिलेसमोर न्यायालयात एक व्यक्ती विनाकपडे उपस्थिती लावते हे खूपच अपमानजनक आहे. एक महिला न्यायालयात प्रतिवाद करत असताना एक जण विनाकपडे न्यायालयात बसला आहे. माय लॉर्ड हे काय सुरू आहे? असे वाटत आहे की तो माणूस न्यायालय आणि माझ्यासमोर अंघोळ करत आहे. असे कसे होऊ शकते?
अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी न्यायालयाने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. महिलांसाठी असे दृष्य खूपच काळजीत टाकणारे आहे. हे कृत्य खोडकर आणि जाणूनबुझून केले आहे असे मानण्यास माझ्याकडे कारण आहे. न्यायालयाचा हा घोर अपमान आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती काढून संबंधित व्यक्तीला नोटीस पाठविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.