सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलिवूड मधील प्रख्यात आणि नवविवाहित दाम्पत्य विकी कौशल आणि कतरिना कैफ हे प्रथमच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या जोडप्याने नुकताच विवाह केला आहे. ही जोडी लवकरच आपल्या चाहत्यांच्या भेटीला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येणार आहे. दिग्दर्शक फरहान अख्तरच्या चित्रपटात कतरिना कैफची भूमिका पक्की होती. आता याच चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कतरिना आणि विकी कौशल यांना सोबत काम करतांना बघण्याची उत्कंठा चाहत्यांना आहे. फरहान अखतरच्या ‘जी ले जरा’ हा चित्रपट कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. आता या चित्रपटात भूमिका करण्यासाठी विकीने सहमती दर्शवली आहे. विकी आणि कतरिना यांचा एकत्र भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट असणार आहे.
यापूर्वीही अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी लग्नगाठ बांधल्यानंतर काही जाहिरातींमध्ये एकत्र काम केले. या जोडीला प्रेक्षकांनी दाद दिली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची घट्ट मैत्री आहे. ते लग्न करणार असल्याच्या चर्चा अधून मधून झडत असतात. त्यांचे अजून लग्न झाले नसले तरी ते देखील एकत्र जाहिराती करत आहेत.
विकी आणि कतरिना यांना एका हेल्थ प्रॉडक्टच्या प्रचाराची ऑफर देण्यात आली आहे. लवकरच त्याचे शुटिंग होणार असल्याचे सांगितले जाते. विकी-कतरिनाने दुसऱ्या एका लक्झरी ब्रँडसाठीही साइन अप केले आहे. कतरिना कैफ ही लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटात मध्ये दिसणार आहे तर विकी कौशलचा ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.