नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर डी कोल्ड टोटल, विक्स ॲक्शन ५०० यासारखी औषधे घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, या दोन औषधांसह अन्य औषधांवर लवकरच बंदी येऊ शकते. एकापेक्षा जास्त औषधे वापरुन तयार केली जात असलेली आणि मेडिकल भाषेत कॉकटेल औषध म्हणून ओळखली जाणाऱ्या १९ औषधांवर लवकरच बंदी येणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकार निर्णय जाहीर करणार आहे.
एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण असलेल्या सिरप किंवा टॅब्लेटला एफडीसी किंवा कॉकटेल औषध म्हणतात. कॉकटेल औषधाच्या वाढत्या वापराचे काही दुष्परिणाम देखील दिसून आले आहेत. अँटिबायोटिक कॉकटेल औषधांच्या जास्त वापरामुळे अँटिबायोटिक परिणामकारकता कमी होण्याचा धोका आहे. यामुळेच आता सरकारने कॉकटेल ड्रग्जबाबत कडक भूमिका घेतली आहे. केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटनेने एक यादी तयार केली आहे. या यादीत १९ औषधांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालय या यादीवर निर्णय घेणार आहे. सर्दी, ताप यासारखी लक्षणे जाणवल्यास अनेकजण लगेच डॉक्टरकडे जात नाहीत. या साधारण आजारात बहुतांश लोक थेट मेडिकलमध्ये जाऊन ताप, सर्दीच्या गोळ्या विकत घेतात आणि त्याचे सेवन करतात. यामुळे सर्दी, ताप, खोकला यासांरख्या आजारांवर घेतल्या जाणाऱ्या औषधांची नावे अनेकांना तोंडपाठ असतात.
ही आहेत औषधे
तज्ञ समितीने १९ औषधांची यादी तयार केली असून त्यात सुमो, निसिप, डी कोल्ड टोटल, विक्स अॅक्शन ५०० अॅडव्हान्स्ड, कफ सिरप टेडीकॉफ, टॉसेक्स, ग्रिलिंक्टस, एस्कोरिल सी, कोडीस्टार, पिरिटन एक्सपेक्टोरंट आणि अँटीबायोटिक क्लिंडामायसिन यांचा समावेश आहे. या औषधांचे उत्पादन करणाऱ्या फार्मा कंपन्यांमध्ये अल्केम, सिप्ला, रेकिट बेंकिसर, प्रॉक्टर अँड गॅम्बल, अॅबॉट, ग्लेनमार्क, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन, मॅनकाइंड फार्मा यांचा समावेश आहे.
अन्य देशात काय आहे
सिरप आणि टॅब्लेटमध्ये एकापेक्षा जास्त औषधे मिसळून तयार केल्या जाणाऱ्या कॉकटेल औषधांच्या विक्रीवर विकसित देशांमध्ये बंदी आहे. भारतातही आता अशा १९ सिरप आणि गोळ्यांवर बंदी येऊ शकते. या अशा प्रकारच्या औषधांची यादी तयार करण्यासाठी डॉ. एम. एस. भाटिया, प्राध्यापक आणि प्रमुख, मानसोपचार विभाग, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती तयार करण्यात आली. केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटनेकडून १९ FDC ची यादी तयार केली. ही यादी आता आरोग्य मंत्रालयाला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Vicks Action 500 D Cold Total Tablet ban Soon by Union Government