इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुम्हाला हा प्रत्यय येईलच
कोणत्याही कठीण प्रसंगी गांगरू नका. सर्वप्रकारच्या खडतर प्रसंगातून धीर, मुग्धता, विश्रांतस्थिती आणि शरणागती या गोष्टी फायद्याच्या ठरतात. त्यासाठीच अशा प्रसंगीं ‘स्व’ला विसरण्याचा अभ्यास करा. म्हणजे त्या प्रसंगांना तोंड देणारी शक्ति आणि ज्ञान यांचे झरे तुमच्या हृदयांत निर्झरू लागलेले तुम्ही पहाल. तुमचे रक्षण करण्यासाठी शक्तीच्या अक्षय्य निधीतून पाहिजे तितकी शक्ति पुरविण्यास देव सदैव सिद्धच आहे हे तुम्ही पहाल.
संकटसमयी मदत मागण्याकरिता उगीचच इकडे तिकडे धावपळ तुम्ही का करावी? त्याऐवजी चित्त शांत करून निश्चलपणे बैठक मारून बसा. वरून तुमच्यावर शांति-प्रकाश-शक्तीचा वर्षाव होत आहे, असे चिंतन करा. तुमच्या मनावरील काळजीचे दडपण जाईपर्यंत तसेच बसून रहा. दडपण नाहीसे होताच सर्वांगी उत्साह व शक्ति यांचा संचार झाल्याचा स्पष्ट प्रत्यय तुम्हास येईलच येईल.