विचारपुष्प
…तर आपण काळजीतून मुक्त होऊ
आपल्या जीवनात अशा काही गोष्टी घडतात आणि परिस्थिती निर्माण होतात की त्यांमध्ये काही बदल घडविणे आपल्या हाती नसते; तरीही त्याबद्दलच्या काळजीने आपण गांजतो. वास्तविक अशा गोष्टी सरळपणे परमेश्वरावर, जगाच्या निर्मात्याकडे सोपवून आपण काळजीतून मुक्त होऊन जावे.
मनाच्या स्वभावाप्रमाणे त्यासंबंधी पुनः पुनः विचार येतील तर पुनः पुनः ते परमेश्वरास अर्पण करीत रहावे. या अभ्यासाने कोणत्याही परिस्थितीत समचित्त राहणे सुलभ होईल व आंतरिक जीवनात आश्चर्यकारक प्रगति घडलेली दिसेल.
आपण जे काही असू, आपल्या जवळ जे काही सदोष-निर्दोष-अपूर्ण गुणधन असेल आणि जी काही पात्रता, सामर्थ्य, स्फूर्ति, कला, कौशल्य, विद्या असेल त्या सर्वांसह परमेश्वराच्या आधीन झाले पाहिजे; म्हणजेच मग या जीवनातील सर्व काळजी, विवंचना, अस्वस्थता संपून जीवन आनंदाच्या मंगलमय प्रकाशाने उजळून जाईल.