इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
‘मौनं सर्वार्थ साधनम्।’ याचा खरा अर्थ
दुसऱ्यासंबंधी बोलू नये, मौन धरावे हा झाला मौनाचा एक प्रकार. दुसरेही एक मौन आपण पाळावयास पाहिजे. ते म्हणजे स्वतः विषयीचे – आंतरिक व बाह्य कल्पनाशक्तीच्या परिभ्रमणास आपण आवरले पाहिजे. आपले शिक्षण, पराक्रम, जुन्या आठवणी व पुढील बेतबात वगैरे विषयींचे पुराण सांगणे व मनात घोळविणे बंद केले पाहिजे.
तुम्ही खरोखरीच प्रगती करून घेतली असली, तरी त्याविषयीचे विचार मनात घोळविण्याची व जिभेवर खेळविण्याची काय जरूरी आहे? यावर संयम राखून क्षणोक्षणींच्या कर्तव्य पूर्तीवर तुम्ही आपले मन एकाग्र केले पाहिजे. ते केले म्हणजेच मग खऱ्या अर्थाने तुम्ही मौन पाळलेत. ‘मौनं सर्वार्थ साधनम्।’ याचा खरा अर्थ तुम्हास समजला ना?