इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
श्रीकृष्णाला हेच तर सांगायचे आहे
एखादी गोष्ट कोणत्या वृत्तीने केली जाते, तिची उभारणी कोणत्या तत्त्वाच्या आधारावर केली जाते आणि तिचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो, यावर सारे काही अवलंबून असते. राजकारण हे काही नेहमीच चांगले, स्वच्छ असते असे नाही, किंबहुना बरेचदा ते तसे नसतेच. युद्धालादेखील आध्यात्मिक प्रकारचे कृत्य असे म्हणता येणार नाही. ‘श्रीकृष्णा’ने ‘अर्जुना’ला अत्यंत भीषण प्रकारचे युद्ध करण्याचे आवाहन केले आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, माणसांनी सर्व प्रकारची मानवी कर्मे, ‘सर्वकर्माणि’ करावीत म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले आहे.
आता, ‘श्रीकृष्ण हा आध्यात्मिक मनुष्य नव्हता किंवा त्याने अर्जुनाला दिलेला सल्ला चुकीचा होता किंवा तो तत्त्वतः गैरलागू होता’ असे म्हणून तुम्ही वाद घालत बसणार का? श्रीकृष्ण तर याही पुढे जात उद्घोषित करतो की, एखाद्या मनुष्यास त्याच्या मूलभूत प्रकृतिधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार जे कर्म करण्यास सांगण्यात आले आहे, ते कर्म जर त्याने त्याच्या आणि त्या कर्माच्या धर्मानुसार केले आणि योग्य प्रकारे आणि योग्य वृत्तीने केले तर, तसे कर्म केल्याने तो ‘ईश्वरा’प्रत जाऊ शकतो. ‘ब्राह्मण’, ‘क्षत्रिय’ यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण ‘वैश्य’ धर्माला आणि त्याच्या कर्मालाही मान्यता देतो…
श्रीकृष्णाच्या भूमिकेतून पाहायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने व्यापारउदिम करणे, पैसे मिळविणे, नफा मिळविणे आणि तरीसुद्धा तो आध्यात्मिक असणे, त्याने ‘योगसाधना’ करणे, त्याला आंतरिक जीवन असणे शक्य आहे. ‘भगवद्गीता’ आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून सातत्याने कर्माचे समर्थन करते. ‘भक्ती’ आणि ‘ज्ञानमार्गा’प्रमाणेच ‘कर्ममार्गा’चे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. श्रीकृष्ण कर्माला एक अधिक उच्चतर नियम लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा फलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे असे त्याचे सांगणे आहे.