इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
सतत टिकणारा विजय म्हणजे
खराखुरा स्वतंत्र आणि मुक्त तोच, ज्याला ऐहिक विलोभने बांधू अथवा आकर्षित करू शकत नाहीत. जो कोणाच्याही दडपणाखाली दडपला जात नाही, ज्याला गर्व, क्रोध अथवा भय यांचा स्पर्श होत नाही. भगवंताच्या प्रेरणेनुसारच जो कर्म करतो, ज्याच्या मनांत कर्माविषयी आसक्ति उरलेली नसते. अधर्माची मोहिनी त्यावर पडलेली नसते आणि ज्याची इच्छा भगवंताच्या इच्छेशी एकरूप होऊन कार्य करीत असते.
पण जो स्वतःच्या भावावेगानुसार वागतो,— मग तो स्वकुटुंब-कल्याणासाठी, कुळाच्या थोरवीसाठी, नीतिच्या प्रतिष्ठेसाठी किंवा देश कल्याणासाठी वागो — तो मनुष्य खराखुरा स्वतंत्र, मुक्त व उन्नत झालेला प्राणी नव्हे.
प्रकृतीवर अंतरात्म्याचा संपूर्ण व सतत टिकणारा विजय म्हणजेच खरीखुरी स्वतंत्रता व मुक्ति होय. भावावेगांपासून अलिप्त होऊन खरे स्वतंत्र व्हा.