संत चरित्राकडे पहा आणि मनात आशेला जागा द्या. कारण हे महात्मे आज अत्यंत शांत, निश्चिंत व संतुष्ट दिसत असले तरी त्यांची स्थिती सुद्धा एकेकाळी अगदी तुमच्या सारखीच होती.
दौर्बल्य, दोषपूर्णता, पापप्रवृत्ती यांनी गांजलेले असेच ते होते. संसाराच्या ओझ्याखाली ते वाकलेले होते. मार्गावरील काट्याकुट्यांनी तेही त्रस्त होते.
कधी कधी वाट चुकून त्यांची पावले भलत्याच मार्गावर पडली होती. त्यांनाही अपयश व पतन यांना तोंड द्यावे लागले होतेच. ते एका काळी अगदी सामान्य असेच होते.
दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्षे येतात व जातात आणि एकाच रागरंगाचे जीवन-रहाट आपण हाकत बसलेले असतो, तसेच त्यांचेही होते. पण त्यांनी धीर धरून, प्रयत्नपूर्वक एकेका वैगुण्यावर विजय मिळवत मिळवत स्वतःचे जीवन विशुद्ध केले.
परमेश्वराने कधी कधी त्यांच्यावर कसोटीचे प्रसंग आणून या शुद्धीकरणास साह्य केले. आणि शेवटी ते पावित्र्यमूर्ती बनले. तुमचेही तसेच का होणार नाही? अवश्य होईल….