इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
गुलाबाचे फूल हे माणसापेक्षा अधिक चांगले,
कसे?
जगातील अनेक सुंदर रूपांपैकी, ‘निरपेक्ष, निर्व्याज कृती’ हे एक सर्वोत्तम रूप आहे. पण तुम्ही मानसिक गतिविधींच्या दिशेने जसजसे वरवर चढू लागता तसतशी ही निरपेक्ष, निर्व्याज कृती दुर्मिळ होऊ लागल्याचे आढळते. कारण बुद्धी आली की त्या बुद्धीच्या बरोबरीने सर्व चलाखी, अक्कलहुशारी, भ्रष्टपणा, देवाणघेवाण यांची सुरुवात होते.
आपण गुलाबाच्या फुलाचे उदाहरण घेऊ : जेव्हा एखादे गुलाबाचे फूल उमलते तेव्हा ते अगदी सहज-स्वाभाविकपणे उमलते. सुंदर असण्याच्या आनंदाने, मधुर सुगंध देण्यासाठी, जीवनाचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी ते उमलते. कोणत्याही लाभहानीचा ते विचार करत बसत नाही. त्याला त्यामधून काही मिळवायचे नसते. ते अगदी सहजस्फूर्तपणे, अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या आनंदाने बहरून येते… याउलट मनुष्याचा विचार करू.
ज्या क्षणी मनुष्याचे मन सक्रिय होते त्याच क्षणी मन त्या सौंदर्यापासून आणि हुशारीपासून काही लाभ मिळवू पाहते. त्यापासून काहीतरी मिळावे अशी त्याची अपेक्षा असते. लोकांकडून स्तुती किंवा कौतुक किंवा त्याहीपेक्षा जास्त असा काहीतरी लाभ व्हावा अशी त्याची अपेक्षा असते. परिणामत: गुलाबाचे फूल हे माणसापेक्षा अधिक चांगले असते.