इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
निवड अशी करावी
निवड ही पसंती-नापसंतीविना कशी करायची आणि अंमलबजावणी ही इच्छाविरहित पद्धतीने कशी करायची हे न समजणे ही आत्म-संयमाच्या आणि खऱ्या चेतनेच्या विकसनाच्या मुळाशी असणारी मोठी अडचण असते. अशा प्रकारे, निवड करणे म्हणजे खरे काय आहे ते पाहणे आणि ते प्रत्यक्षात आणणे. आणि अशा रीतीने निवड करणे म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दलच्या, कोणत्याही व्यक्तीबद्दलच्या, कृतीबद्दलच्या, परिस्थितीबद्दलच्या कोणत्याही वैयक्तिक पूर्वग्रहाविना निवड करणे. ही गोष्ट सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत कठीण असते.
तरीसुद्धा, व्यक्तीने कोणत्याही पसंती-नापसंतीशिवाय, सर्व आकर्षणे आणि आवडीनिवडी यांपासून मुक्त होऊन, फक्त मार्गदर्शन करणाऱ्या ‘सत्या’वर आधारित स्वतःची भूमिका घेऊन, कर्म करायला शिकले पाहिजे. आणि ‘सत्या’ला धरून, आवश्यक असणाऱ्या कृतीची एकदा का निवड केली की मग, व्यक्तीने ती कृती कामनाविरहितपणे पूर्णत्वाला नेली पाहिजे.