विचार पुष्प
कोणी कसे का वागेना
‘कोणी कसे का वागेना, आपण आपल्याकडून चांगले वागायचे, कर्तव्याला चुकायचें नाही, असें माझें धोरण आहे.’ अशी ही भाषा आपण नेहमी ऐकतो; परंतु वस्तुस्थिति खरोखरीच तशी असते का हे पाहिले पाहिजे.
यासाठी कसोटीचे प्रसंग मुद्दाम शोधण्याची गरज नाही. नित्याच्याच बारीकसारीक प्रसंगी ही गोष्ट कसोटीस लागत असते. तुमच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडतांना तुमचे धैर्य, उदारता, आत्मनिष्ठा, गौरव, प्रेम आणि सहानुभूति यांची परीक्षा होत असते.
तुमचे काही नातेवाईक व मित्र असतील, ज्यांच्या संवयी, विचार, वागणे तुम्हाला नापसंत व अप्रिय असूनहि तुमच्या विषयी त्यांच्या मनात आदर व प्रेम असते का? तुमचा त्यांना आधार वाटतो का? येथेच तुमची खरी कसोटी लागते.