इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
प्राण्यांविषयी तुम्हाला हे माहीत आहे का?
प्राण्यांबाबत आणखी एक गोष्ट : जर मालक खरोखरच चांगला असेल आणि प्राणी विश्वासू असेल तर, त्यांच्यामध्ये एक प्रकारे आंतरात्मिक शक्तींचे आदानप्रदान होते. हे आदानप्रदान प्राण्यांच्या दृष्टीने खूपच सुंदर, अद्भुत असते; ते त्यांना उत्कट आनंद मिळवून देते. अशा प्रकारे, जेव्हा त्यांना तुमच्या जवळ राहायचे असते आणि जेव्हा तुम्ही त्यांना हृदयाशी कवळून घेता तेव्हा, त्यांना आतूनच ते स्पंदन जाणवते. व्यक्ती त्यांना ती शक्ती देते — प्रेमाचे सामर्थ्य, हळुवारतेचे, सौहार्दाचे, संरक्षणाचे, सारे सारे काही — त्यांना जाणवते आणि त्यांच्यामध्ये त्या व्यक्तीविषयीचा एक खूप गाढ असा अनुबंध निर्माण होतो.
मनुष्यामध्ये मनाचे कार्य सुरू झाले तेव्हा, त्याच्या अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये, त्याच्या पहिल्यावहिल्या आविष्करणामध्ये, त्याने अनेक गोष्टी बिघडवून टाकल्या, ज्या वास्तविक पूर्वी खूप सुंदर होत्या. तेव्हा हे उघड आहे की, माणूस जर उच्चतर पातळीवर जाईल आणि त्याच्या बुद्धीचा सुयोग्य उपयोग करेल तर, त्यामुळे गोष्टींना अधिक मूल्य प्राप्त होईल. पण या दोहोंच्या दरम्यान, एक असा प्रांत आहे की, जेथे माणूस त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर अगदी असभ्य आणि खालच्या पातळीवरून करतो. तो मनाला हिशोबाचे, वर्चस्वाचे, फसवणुकीचे साधन बनवितो आणि त्यामुळे ते मन कुरूप होऊन जाते. काही प्राणी असतात की, जे माणसाच्या सहवासात आल्यानंतर या साऱ्या गोष्टी शिकतात, पण काही प्राणी असे असतात की, ज्यांच्या ठायी याचा लवलेशही नसतो.