इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
असणे हे जीवनात केवढे भाग्य!
पाप कर्माने न डागळलेले, पापविचाराने मलिन न झालेले मन असणे हे जीवनात केवढे भाग्य! अशा माणसाच्या जीवनात शांती व आनंद यांचे राज्य नांदेल. त्याच्या जीवन सरितेतील जल स्वच्छ, खळखळणारे, मधुर ध्वनी उत्पन्न करणारे असेल, त्यातून शुद्ध कर्मे, उपकारक कृत्ये, प्रामाणिक व्यवहार, प्रसन्न संतोष वृत्ति, नित्य उत्साह यांचेच तुषार सभोंवती फेकले जातील.
दवबिंदू अंगावर चमकत असतांना खुडलेल्या वनस्पती ज्याप्रमाणे बराच वेळ टवटवीत राहतात, त्याप्रमाणे समजदार माणसाने केलेल्या संस्कारांचा मनास, वाणीस आणि वर्तनास येणारा सुवास कितीतरी वेळ टिकून राहतो. त्याच्या स्मरणानेही इतरांचे भान सुमधूर बनून जाते. जीवनातील आनंद पुष्पांचा सुगंध व तजेलदारपणा त्यांना या सत्कर्मांनीच प्रदान केलेला असतो.