इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हीच तर खरी संधी आहे
प्रेमपूर्वक कर्तव्यकर्मे करण्यासाठी, तुमच्या अंगी असलेली सर्व शक्ती कामास लावा. त्यात संकोच, कंजूषपणा नका करू. देवाकरिता, त्याच्या स्मरणासह करावयाच्या कामात सामान्य कर्म, विशेष कर्म, क्षुल्लक अथवा टाकाऊ कर्म असे भेद कसे करता येतील? दुसऱ्याच्याकडून होणारे आघात दुबळेपणामुळे चुकविण्याचे नशिबी येणे हे केवढे दुर्भाग्य!
यत्न करा आणि दुसऱ्यांच्या दुःस्वभावास तोंड द्या. टाळू नका. दुसऱ्यांची भिन्न मते खोडू नका. त्यावर चिंतन करा. दुसऱ्यांच्या विरोधामुळे त्याच्यावर रागावू नका. आपली पावले नीट पडत आहेत की नाही हे पाहण्याची ती संधी माना. आजाऱ्यांना आनंद द्या. गरीबांना हात द्या. सर्वत्र अविरोधभाव धारण करून स्वतःचें आत्मबल अमाप वाढवा.