इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हेच तुमचे प्रथम कर्तव्य आहे
नेहमी संतुष्ट राहून देवाच्या कृपेची सतत जाणीव राखणे हे, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असला किंवा कोणतेही काम करीत असला तरी तुमचे सर्वांत प्रथमचे कर्तव्य आहे. तुम्ही मोठ्या मंत्र्याच्या हुद्यावर असा वा एखाद्या खेडेगांवांतील पडक्या जागेतील शाळेत गरीब, दुबळ्या व घाणेरड्या पोराबाळांना अक्षरओळख करून देण्याचे काम करीत असा, दोन्हींही देवाचींच कार्ये असल्याने तुम्ही सतत संतुष्ट असले पाहिजे.
आपल्या व्यवसायाविषयी तुम्ही मनात प्रीती बाळगली पाहिजे. कधी समजा, मधेच काही घडले आणि दुसरेच कसलेतरी काम करण्याचा प्रसंग आला, तरीसुद्धा तुम्ही म्हटले पाहिजे, ‘ठीक आहे. या कामाला मी पात्र नसलों, तर त्यांत बिघडले कुठे? ते मी करावे अशी देवाची इच्छा दिसत आहे, तेव्हां हेही काम मी मनःपूर्वक व अत्यंत उत्तम प्रकारे करीन व त्यांतूनही आनंद प्राप्त करीन.