इतरांशी मिसळून जाल असे सामान्य बना. आपण इतरांसारखेच आहोत, अशी भावना राखा.
सामान्य व लघु बनण्यानेच, तुम्ही सामान्य व लघु गोष्टींतील आनंद आणि दिव्यता जाणण्यास समर्थ व्हाल. थोड्याशा विशेषाचे अभिमानी बनून स्वतःस इतरांपासून वेगळे समजून, अफाट मानवजातीसमोर तुमचा निभाव लागणार नाहीं, हें ध्यानीं धरा.
लघु होण्याच्या प्रयत्नात असतांना आपल्या खेरीज आणखी दुसऱ्या कोठून तरी त्या प्रयत्नास साहाय्य करणारा संयम आपोआप घातला जात आहे, लगाम खेचला जात आहे असा अनुभव येईल, तर समजा, तुमच्या यत्नास परमेश्वराचे पाठबळ मिळाले आहे. त्याउलट आतून जर दुःख, हुरहूर अथवा बेचैन वाटेल, तर मदतीसाठी प्रार्थनेची गरज आहे असे जाणा.
स्वतःच्या इच्छा व ध्येय-कल्पना या बाबतीतील हेका टाका. म्हणजे एकेक पावलागणिक प्रकाश व हात देणारी भगवद्शक्ति पाठीशी उभी राहील.