इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हे आहे महान रहस्य
निर्भरतेची वृत्ती म्हणजे परिपूर्ण साधनेचे महान रहस्य आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी किंवा कोणतीही अडचण आली तरी, ईश्वरावर विसंबून राहणे म्हणजे ‘निर्भर’ असणे. जेव्हा सारे काही सुरळीत चालू असते तेव्हा ‘निर्भर’ असणे याला विशेष काही अर्थ नाही. पण जेव्हा आतूनच एक प्रकारचा असमाधानाचा सूक्ष्मसा ताण जाणवत असतो तेव्हा अलिप्त कसे ठेवावे?
तर त्या असमाधानापासून अलिप्त होऊन. …स्वतःमधील जो ‘साक्षी’ आहे त्याने मागे उभे राहणे आणि येणाऱ्या स्पंदनांकडे ती स्वतःची (आपल्या आत्म्याची स्पंदने) आहेत असे समजण्यास नकार देणे, ती स्पंदने म्हणजे आपल्या गतकालीन प्रकृतीची सवय आहे किंवा सार्वत्रिक प्रकृतीचे आपल्यावर झालेले आक्रमण आहे, अशा रीतीने त्यांच्याकडे पाहाणे. हे लक्षात घेऊन त्यांना हाताळणे म्हणजे अलिप्त होणे. हे अवघड आहे असे वाटू शकते पण व्यक्ती चिकाटीने प्रयत्न करत राहिली तर तिला ते चांगल्या रीतीने साध्य होते.